१० रुपयांचा वडापाव २० रुपयांना का झाला? - ओळखा पाहू तुमचा खरा शत्रू कोण?

Understanding Inflation: Why Your ₹10 Vada Pav Now Costs ₹20?

MUTUAL FUNDBLOG POST

inflation-explained-vada-pav-price
inflation-explained-vada-pav-price

नमस्कार मित्रांनो!

तुम्हाला आठवतंय का? ५-१० वर्षांपूर्वी आपण खिशात १०० रुपये घेऊन बाजारात गेलो तर पिशवी भरून भाजी घेऊन यायचो. आज १०० रुपयात काय येतं? कोथिंबीर आणि दोन जुड्या मेथी घेतल्या की १०० ची नोट संपली!

ह्यालाच म्हणतात महागाई (Inflation)! आणि दुर्दैवाने, हाच तुमच्या कष्टाच्या पैशांचा सर्वात मोठा छुपा शत्रू (Silent Killer) आहे.

चला, एक सोपं उदाहरण घेऊ. आपल्या महाराष्ट्राचा लाडका 'वडापाव'.
काही वर्षांपूर्वी हा वडापाव ५-७ रुपयांना मिळत होता. आज चांगल्या ठिकाणी तो १५ ते २० रुपयांना मिळतो. उद्या तो २५-३० रुपयांना मिळेल.

आता गंमत बघा:
जर तुम्ही १० वर्षांपूर्वी तुमचे १०० रुपये कपाटात किंवा गल्ल्यात सुरक्षित ठेवले असते, तर त्या वेळी त्यातून २० वडापाव आले असते (५ रु. प्रमाणे).
पण आज, १० वर्षानंतर तुम्ही तीच १०० ची नोट कपाटातून काढली, तर त्यातून फक्त ५ वडापाव येतील (२० रु. प्रमाणे).

पैसे तेच आहेत (१०० रुपये), पण त्याची ताकद (Purchasing Power) कमी झाली!

धोका कुठे आहे?
आपण आपले पैसे सुरक्षित रहावे म्हणून बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतो, जिथे साधारण ३% ते ४% व्याज मिळते. किंवा FD मध्ये ठेवतो जिथे ६-७% मिळते.
पण महागाईचा दर सुद्धा ६% ते ७% आहे!

म्हणजेच, जर तुमचे पैसे बँकेत ७% ने वाढत असतील आणि महागाई सुद्धा ७% ने वाढत असेल, तर तुम्ही जागेवरच आहात! तुम्ही श्रीमंत होत नाही आहात, तुम्ही फक्त पैशांची 'संख्या' वाढवत आहात, 'किंमत' नाही.

मग या शत्रूला हरवायचे कसे?
महागाईला हरवण्यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी पैसे गुंतवावे लागतील, जिथे तुम्हाला महागाईपेक्षा जास्त (उदा. १०%, १२% किंवा १५%) परतावा मिळेल.

आणि इथेच एन्ट्री होते - म्युच्युअल फंड आणि SIP ची!

हे कसं शक्य आहे? शेअर मार्केट पडलं तर काय होईल? मी तर सामान्य माणूस आहे, मला हे जमेल का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. पण एक लक्षात ठेवा - 'पैसे कपाटात ठेवून श्रीमंत होता येत नाही, त्यांना कामाला लावावं लागतं!'

भेटूया उद्या, एका नवीन विषयासोबत!